शेअर मार्केटमध्ये त्सुनामी, गुंतवणूकदारांचे आठ लाख कोटी बुडाले

0
120

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : देशातील शेअर बाजारांनी पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली. नफावसुलीमुळे मंगळवारी 23 जानेवारी रोजी सेन्सेक्स तब्बल 1053.10 अंकांनी कोसळून 70,360.55 वर बंद झाला. तर निफ्टीही 333 अंकांचा मोठी घसरण नोंदवत 21,238.80 अंकांवर आला. बँकिंग, मिडकॅप आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधील नफा बुकिंगमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. या घसरणीत सर्वात मोठी भूमिका रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेची होती. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक तीन टक्क्यांनी घसरले. बीएसई लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 366 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले.

जागतिक बाजारपेठेत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात घसरण दिसून आली. बँक, ऑइल अँड गॅस, एफएमसीजी आणि मेटल शेअर्स घसरले. तर फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टीच्या घसरणीत रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेचा निम्म्याहून अधिक वाटा आहे. पश्चिम आशिया आणि लाल समुद्रातील तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी दोन महिने भारतात खरेदी केली होती. परंतु या महिन्यात आतापर्यंत त्यांनी 13,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

झी एंटरटेनमेंटचा शेअर 30.74 टक्क्यांनी घसरून 160.50 रुपयांवर आला. सोनीने झी सोबतचा 10 अब्ज डॉलरचा करार तोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे ब्रोकरेज कंपन्यांनी झी शेअर्सचे अवमूल्यन केले आणि लक्ष्य किंमतही कमी केली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.