“शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या कंपनी संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक”

0
92

पुणे, दि. २६ ( पीसीबी )  – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गुंतवणुक करण्यास लावून ९ कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या साई इंडस मार्केटिंग व श्री मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

भालचंद्र महादेव अष्टेकर (रा. श्वेता कुंज अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकांना वेगवेगळ्या तीन स्कीममध्ये गुंतवणुक करण्यास सांगून त्यात मासिक ४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला काही महिने व्याज देऊन नंतर त्याने गाशा गुंडाळून फरार झाला होता. त्याने १२१ जणांची ९ कोटी रुपयांची फसवणुक केली असल्याची मुळ फिर्याद दाखल आहे. परंतु, त्याने जवळपास एक हजार जणांची फसवणुक केली असून त्याची रक्कम जवळपास दीडशे कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे फसवणुक झालेल्यांचे म्हणणे आहे.

याबाबत विजयकुमार मुरलीधर घाटे (वय ५३, रा. शिवणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या एका व्यावसायिक मित्राने त्यांना साई इंडस मार्केटिंग व श्री मल्टी सर्व्हिसेसमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देत असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला २ लाख रुपये गुंतविले. त्याचे मासिक ४ हजार रुपये व्याज त्यांना लागोपाठ ३ महिने मिळाले. त्यानंतर त्यांनी आणखी मुलाच्या व पत्नीच्या नावावर गुंतवणूक केली. भालचंद्र अष्टेकर याने गुंतविलेल्या मुद्दलाचे त्यांना पोस्टडेटेड चेक दिले. १० ऑक्टोंबर २०२३ रोजी त्याने गुंतवणुकदारांचा मेळावा घेतला. त्यात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. त्यानंतर डिसेबर २०२३ पासून परतावा येणे बंद झाले.

कार्यालयात जाऊन चौकशी केल्यावर तेथील कर्मचारी तुमचे पैसे बुडणार नाहीत, कंपनीचे पैसे अडकले आहेत, लवकरच पैसे मिळतील, असे समजावून सांगायचे. एप्रिल २०२४ मध्ये अष्टेकर याने झुम मिटिंग घेऊन सर्वांना लवकरच पैसे मिळतील, पोलिसांकडे जाऊ नका, पोलिसांकडे गेल्यावर कोणाचेच पैसे मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर भालचंद्र अष्टेकर याच्या कार्यालयातील लोक कार्यालय बंद करुन निघून गेले. अष्टेकर याचा मोबाईलही बंद होता. त्याची वेबसाईटही मे २०२४ पासून बंद झाली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर त्यांना १२१ लोकांची ९ कोटी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत याची फिर्याद दिली. ६ सप्टेंबर २०२४ रोजी याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

याबाबत विजयकुमार घाटे यांनी सांगितले की, आम्ही माहिती घेतली व गुन्हा दाखल केला तेव्हा १२१ जणांची ९ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले होते. परंतु, त्याने जवळपास १ हजार जणांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. गेले पाच महिने तो फरार होता. आम्ही वारंवार पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. पंरतु, तपासाबाबत काही माहिती मिळत नव्हती. शेवटी मंगळवारी पोलिसांनी फोन करुन भालचंद्र अष्टेकर याला अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी आता त्याने या पैशांमधून घेतलेल्या मालमत्ता जप्त करुन गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत कसे मिळतील, हे पहावे, अशी आमची अपेक्षा आहे.