शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याची 91 लाखांची फसवणूक

0
74

वाकड, पिंपरी दि.२९ (पीसीबी)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत संगणक अभियंत्याची 91 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 10 एप्रिल ते 18 जुलै या कालावधीत रहाटणी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 41 वर्षीय संगणक अभियंत्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली शर्मा 8986513634 क्रमांक धारक, नरेश राठी 8986513634 क्रमांक धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंजली हिने फिर्यादी यांना व्हाट्सअपवर एक लिंक पाठवली. त्यामध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करण्यात आले. ग्रुप मधील सदस्यांना एक स्टॉक सांगून त्यावर निरीक्षण किंवा खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर संबंधित ग्रुप हा सेबी रजिस्टर असल्याचे खोटे सांगून एक लिंक शेअर करण्यात आली. त्यावरून ओटीसी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 91 लाख 63 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी केलेल्या गुंतवणुकीवर सात कोटी 19 लाख 47 हजार 114 रुपये जमा झाल्याचे आरोपींनी भासवले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आणखी रकमेची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.