सांगवी, दि. २० (पीसीबी) : शेअर मार्केटच्या नावाखाली एका तरुणाची ८३ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जून २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
प्रशांत प्रकाश मस्के (वय ३३, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना ब्रेन कॅपिटल या कंपनीची माहिती सांगून विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे अमिष दाखविले. त्यानंतर ब्रेन कॅपिटल कंपनीचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी ८३ लाख दोन हजार रुपये गुंतवणूक केली. फिर्यादी प्रशांत मस्के यांनी डाऊनलोड केलेल्या ॲपवर फिर्यादी यांना दोन कोटी १७ लाख पाच हजार ८१३ रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले. सदरची रक्कम काढायची असल्यास फिर्यादी यांना आणखी ३२ लाख ५५ हजार ८७२ रुपये भरण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.