पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी)
शेअर मार्केटच्या नावाखाली एका नागरिकाची ३८ लाख ८२ हजार ३५१ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पुनावळे येथे घडली.
याबाबत एका ४२ वर्षीय नागरिकाने सोमवारी (दि. २) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारक, बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ जून ते २८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत रावेत येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये घेतले. त्यानंतर त्यांना शेअर बाजाराबाबत माहिती देऊन त्यातून जादा नफा मिळेल, असे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास त्यांना ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यासाठी युझर नेम आणि पासवर्डही दिला. वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास सांगून त्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३८ लाख ८२ हजार ३५१ रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता ॲपवरील त्यांचे खाते लॉक करण्यात आले. वारंवार मागणी करूनही फिर्यादी यांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.