शेअर बाजाराने 28 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; गुंतवणूकदारांचे तब्बल 92 लाख कोटी पाण्यात…

0
4

दि. 1 (पीसीबी) – मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत असलेल्या भारतीय शेअर बाजाराने 28 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे तब्बल 92 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी 1996 मध्ये सलग पाच महिने शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील पाच महिन्यांत सेंसेक्स 11.54 टक्क्यांनी पडला आहे. तर निफ्टीमध्ये 12.65 टक्क्यांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील भांडवलामध्ये मोठी घसरण झाली आहे. हे भांडवल 26 सप्टेंबर 2024 पासून जवळपास 25 लाख कोटी कमी झाले आहे. तर बीएसई-लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 92 लाख कोटींनी घटले आहे.

विदेशी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेअर बाजारात भूकंप आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, अमेरिकी बाँडची वाढती मागणी त्याचप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय़ घेतल्यानेही त्याचा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे.

मार्च महिन्यांत तरी मार्केट तेजीत राहणार का, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढला आहे. साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात नेहमीच तेजी राहिली आहे. गुंतवणुकदारांना कमाई करून देणारा हा महिना असतो. त्यामुळे गुंतवणुकदारांसह अर्थतज्ञांचे लक्षही सोमवारी (ता. 1 मार्च) बाजार उघडण्याकडे तसेच बाजार उघडताच कोणत्या दिशेने जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आजची स्थिती काय?
शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार 1414 अंकानी तर निफ्टीमध्ये 420 अंकांची घसरण झाली मुंबई बाजार 73198 अंकांवर बंद झाला. बीएसईमधील टॉप 30 शेअर्सपैकी 29 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक 6 टक्के घसरण टेक महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये झाली. सप्टेंबरपासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 35 टक्के घसरण झाल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.