विविध कारणांमुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये १००० अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ७३ हजारांच्याही खाली आला, तर निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टीही २२ हजारांच्या खाली आलेले पाहायला मिळाले. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये १०६२ अंकाची घसरण होऊन ७२,४०४ वर बाजार बंद झाला. तर निफ्टीत ३४५ अंकाच्या घसरणीसह २१,९५७ अंकावर बंद झाला. दरम्यान, भाजपचे मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळत नसल्याचे हे संकेत असल्याची जोरदार चर्चा बाजारपेठेत आहे.
शेअर बाजाराच प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे मात्र सहा लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार बीएसीमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण मूल्य ४०० लाख कोटी होते. बाजारात घसरण होऊन हे मूल्य ३९३.७३ लाखांवर आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी आपल्या नफ्यातून ६.२७ लाख कोटी गमावले आहेत.
बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी५० मध्ये घसरण होण्याची कारणे काय?
१. भारतात लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू असून तीन टप्प्यांचे मतदान झाले आहे. या तीन टप्प्यात बरीच अनिश्चितता दिसून आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी बाजारात एकप्रकारची मरगळ दिसत आहे. पंतप्रधान मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी निवडून येणार यावर सर्वसहमती असली तरी विजयाचे अंतर कमी होणार का? यावर बाजाराचे लक्ष आहे. आयएफए ग्लोबलचे मुख्य अधिकारी अभिषेक गोयंका म्हणाले की, भाजपा प्रणीत एनडीएला अपेक्षित बहुमतापेक्षा कमी जागा मिळतील, अशी आशंका वर्तविण्यात येत असल्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण दिसत आहे.
२. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि लार्सन अँड टुब्रो (L & T) यासारख्या मोठ्या कंपन्यातही घसरण पाहायला मिळाली. त्याचाही परिणाम बाजारावर दिसत आहे. एल अँड टीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. याबरोबरच एचडीएफसी आणि आयटीसीचे शेअर्सच्या विक्रीचा धडाका लागल्यामुळे त्याचाही ताण बाजारावर दिसून आला.
३. जागितक स्तरावर सकारात्मकतेचा अभाव असल्यामुळे त्याचाही परिणाम बाजारावर दिसला. बँक ऑफ इंग्लंडचा दराबाबतचा निर्णय आणि अमेरिकेने जाहीर केलेला बेरोजगारीबाबतचा प्राथमिक अहवाल याचा काही प्रमाणात परिणाम झाला. MSCI एशिया पॅसिफिक निर्देशांक ०.१ टक्क्यांनी घसरला. जागतिक बाजारात काही प्रमाणातील घसरण भारतीय बाजरावर दिसून आली.
४. चौथे कारण म्हणजे, मोठ्या कंपन्यांच्या नफ्यावर बाजाराने दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली आहे. एका बाजूला स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने चौथ्या तिमाहीत चांगले आकडे दाखविले असताना दुसरीकेड एशियन पेंट्सच्या कमाईचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला नाही. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा शेअर पाच टक्क्यांनी घसरला. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या कमाईतही चौथ्या तिमाहीत घट दिसली. त्यामुळे शेअरच्या किंमतीमध्ये चार टक्क्यांची घसरण दिसली.
५. सर्वात शेवटी परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री सुरूच ठेवली आहे. ८ मे रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी २,८५४ कोटींच्या शेअर्सची विक्री केली. या आठवड्यात विक्री झालेल्या एकूण शेअर्सची किंमत ५,०७६ कोटींच्या घरात जाते. मार्चपासून गुंतवणूकदारांकडून विक्रीचा हा ट्रेंड दिसत आहे.