शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या

0
59

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई

चिंचवड, दि. १० (पीसीबी) : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या.

साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदांराचा शोध सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका व्यक्तीने फसवणूक प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुलै 2024 मध्ये फिर्यादी फेसबुक पाहत असताना ट्रेडींग बाबतची जाहिरात आली. जाहिरीतीमधील लिंक क्लिक केली असता, त्यांना एका व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

ॲपमार्फत शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यातून व्यक्तीकडून बँक खात्यावर 74 लाख घेऊन फसवणूक केली. या गुन्ह्याचा सायबर सेल मार्फत समांतर तपास सुरू होता. बँक खात्याबाबत तांत्रिक विश्लेषण केले असता, त्यामधील संशयित हे छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सायबर सेलचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे गेले.

पथकाने तांत्रिक विश्लेषण करून खातेधारक साजिद आणि अभिजित श्रीरामे यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पण झाले. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन जप्त केले. संशयितांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेच्या खात्यावरून फसवणूक झाल्याप्रकरणी ‘एनसीसीआर पोर्टल’वर 56 तक्रारी दाखल आहेत. त्याच खात्यामध्ये चार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, अशोक जावरे, श्रीकांत कबुले, अभिजीत उकीरडे यांच्या पथकाने केली.