शेअर खरेदीच्या नावाखाली फसवणूक

0
107

देहूरोड, दि. ७ (प्रतिनिधी)
शेअर खरेदीच्या नावाखाली एका व्यक्तीची २० लाख २४ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १२ एप्रिल २०२४ ते ७ जून २०२४ या कालावधीत किवळे येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.

दत्तात्रय प्रकाश देशमुख (वय ४२, रा. झिनिया सोसायटी, किवळे) यांनी मंगळवारी (दि. ६) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जॅसलिन कौर, जयंत पिरामल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय यांनी इंस्टाग्रामवर अपोलो बिजनेस स्कूलची जाहिरात पाहून त्यावर क्लिक केले असता आरोपी जॅसलिन याने ९७०२६१२३९३ या क्रमांकावरून व्हॉटस्अ‍ॅप द्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. त्यांना अपोलो अरिब नावाच्या अ‍ॅपद्वारे शेअर्स विकत घेऊन त्याद्वारे अधिक नफा मिळविण्याचे अमिष दाखविले. शेअर विकत घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून १७ लाख ४० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी इंस्टाग्रामवर जिओजित फायनान्शियल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीची जाहिरात पाहून आरोपी जयंत पिरामल याच्यावर विश्वास ठेऊन २ लाख ८४ रुपयांची गुंतवणूक केली. या दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांच्या नावे शेअर्स खरेदी न करता त्यांची २० लाख २४ हजारांची आर्थिक फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.