पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा उद्या (शुक्रवारी) विधानसभानिहाय मेळावा आयोजित केला आहे. शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, खासदार संजय राऊत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटी घोटाळ्याबाबत तसेच महाआघाडी म्हणू न निवडणूक लढणार का याबाबत खासदार संजय राऊत काय बोलतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
आकुर्डी येथील सीजन बँक्वेट हॉल, जेम्स क्रिस्टल, तिसरा मजला येथे हा मेळावा पार पडणार आहे.
शुक्रवारी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेमध्ये तिन्ही विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 10.30 ते 11.30 पिंपरी विधानसभा, 11.30 ते 12.30 चिंचवड विधानसभा आणि 12.30 ते 1.30 भोसरी विधानसभा अशा विधानसभानिहाय बैठका होणार आहेत.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीची प्राथमिक तयारी करण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना देण्याकरिता हा मेळावा होत आहे.
महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वांची एकजूट करून एककलमी कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. मेळाव्यात नवीन पदाधिका-यांची निवड देखील केली जाणार असल्याचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.