शिवीगाळ करायची ती करा…,माझ्या अंगाला भोक पडत नाहीत – अजित पवार संतापले

0
47

सिन्नर, दि. 11 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण तरीही सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढणार नाही, अशी चर्चा रंगली आहे. पण आता त्यांनी पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. “जसे कोकाटे यांचे सिन्नर तालुका हे कुटुंब आहे, तसं माझं देखील बारामती हे कुटुंब आहे”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही सिन्नर तालुक्यात होती. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांवर जबरदस्त टीका केली. “रक्षाबंधनाला ओवाळणी दिली तर विरोधक म्हणतं होते की लवकर पैसे काढून घ्या. पण बहिणींना दिलेली ओवाळणी कोणी काढून घेतो का रे? यासाठी धमक असावी लागते. हे काम येड्या गबळाचे नाही”, असे अजित पवार म्हणाले.

“लाडकी बहिण योजनेला विरोधक म्हणाले की हा चुनावी जुमला आहे. पण मी तुम्हाला विचारतो, माय माऊली दिले की नाही? सगळे सोंग करता येते, पैशाचे करता येत नाही. रक्षाबंधनाला ओवाळणी दिली तर म्हणे घ्या काढून लवकर. बहिणींना दिलेली ओवाळणी कोणी काढून घेतो का रे? यासाठी धमक असावी लागते, येड्या गबळाचे काम नाही. ती तिला पाहिजेल ते खर्च करेल”, असेही अजित पवारांनी म्हटले.

“लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. पण बटण कुठल दाबायचं यावर तुमची योजना सुरू राहणार की बंद होणार हे ठरणार आहे. विरोधक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विरोधकांना हात जोडून विनंती आहे, मला जी शिवीगाळ करायची ती करा, माझ्या अंगाला भोक पडत नाही. या योजनेबद्दल खोट सांगून महिलांच्या स्वप्नांची राख रांगोळी करू नका”, असे अजित पवार म्हणाले.