पुणे, दि. १७ (पीसीबी) – माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. शिवसेना फुटीनंतर आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची सोबत केली. सलग तीन टर्म खासदारकी नंतर २०१९ मधे राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. आता यावेळी पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पार्थ पवार, दिलीप वळसे यांची नावे चर्चेत आहेत.
उमेदवारी पाहिजे तर आढळराव यांना दादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागेल. वेळप्रसंगी आढळराव तो निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. त्यामुळे महायुतीकडून आता शिरुर लोकसभा कोण लढणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचलीये. तसंच आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणात बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. तसंच आता महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी कुणाला मैदानात उतरवणार हेही पहाणं आता महत्त्वाचं असणार आहे.










































