शिवाजीराव आढळराव यांना पुणे शहरातून लढण्याची ऑफऱ

0
554

– शिरूर लोकसभा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे शिवसेनेचे संकेत

मुंबई, दि. ६ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे उरली आहेत. शिरूरचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढाळराव-पाटील हे जनतेत लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. संभाव्य महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे शिवसेनेने या निमित्ताने सांगितले आहे. तसेच आढळरावांना रस असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचेही या `ऑफर`मधून दिसून येत आहे.

मंगळवारी मुंबई येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजीराव आढळराव पाटील यांनी `मातोश्री` निवास्थानी भेट घेतली. यावेळी संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजीमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर, जुन्नरचे माजी आमदार जिल्हा प्रमुख शरद सोनावणे उपस्थित होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ”आम्ही आढळराव पाटील यांना गेल्या काही महिन्यांपासून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह करत आहोत. मात्र, त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची लोकप्रियता पाहता, आम्हाला खात्री आहे की ते पुण्याची जागा जिंकतील.”
याबाबत आढळराव पाटील म्हणाले, बैठकीत संजय राऊत यांनी मला पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करण्यास सुचविले आहे. मात्र, मी त्यांना शिरूरची जागा पसंत करणार असल्याचे सांगितले. मला पुण्याच्या जागेवर नाही तर शिरूरच्या जागेत रस आहे, असेही त्यांना स्पष्ट केले आहे. पण राऊत यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता, हे खरे आहे. पक्ष आग्रह धरत असेल तर मी पुण्याच्या जागेबाबत विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.