शिवाजीराव आढळराव पाटील आता अजितदादांचे उमेदवार ?

0
217

पुणे, दि.१९ (पीसीबी) – राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या वाट्याच्या जागांसाठी दावा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिरूरचे राजकारण बदलणार आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने देखील वृत्त प्रसारित केले आहे.

आगामी होणाऱ्या निवडणुकांत अजित पवार गटाने लोकसभेच्या जागांसाठी राज्यभर चाचपणी सुरू केली आहे. त्यात शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाने दावा केला असून त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार गटाकडून होऊ लागली आहे. त्यामुळे आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, शिंदे गटाकडून या जागेबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मात्र अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. पण ते जर अजित पवार गटात आले तर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र या बातमी बाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आपण याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या बातमीने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत