“शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला होता” असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात बोलत होते. “मी चारपाच मागण्या करतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ मातांबाबत कायदा करा. अजामीनपात्र गुन्हा करा. दहा वर्ष जामिनच मिळू नये. महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा. जेणे करून भेदभाव होऊ नये. तेढ होऊ नये” असं उदयनराजे म्हणाले. “सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी. म्हणजे एखाद्या कल्पनेतून कादंबरी होते. पण त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड असावे. रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं. कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी आहे” असं उदयनराजे म्हणाले.
“निजामशाही, मुगलशाहीत शाहजी महाराजांनी त्यांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता, माँ साहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या अंगी तो विचार उतरवला. दावणगिरी जिल्ह्यात शाहजी राजेंची समाधी आहे. या समाधीला केंद्र आणि राज्य सरकारने पुरेसा निधी द्यावा” अशी मागणी उदयनराजेंनी केली. “मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. तिथे काही तांत्रिक अडचणी असतील. केंद्रात स्मारक झालं पाहिजे. पण महाराष्ट्रात राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी ४८ एकर जागा आहे. तिथे स्मारक झालं पाहिजे. स्मारक बनवण्यामागचा हेतू भावी पिढीला विचार घेता येईल हा असतो. देशाची प्रगती होईल हा त्यामागचा विचार असतो” असं उदयनराजे म्हणाले.
“याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवस पाहिला. महाराज ५०व्या वर्षी गेले. त्यांना अजून २० ते ३० वर्ष मिळाली असती तर इतिहास बदलला असता. महाराजांमुळेच आपण टिकून आहोत. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये हा त्यांचा संदेश होता. अन्यायाच्या ठिकाणी तात्काळ शिक्षा द्यायचे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“औरंगजेब आणि अफजल खान यांनी महाराष्ट्रावर चाल केली. त्यांची थडगी याच भूमीत बांधली. अमित शाह हे कणखर गृहमंत्री आहेत. त्यांनी ३०७ कलम हटवलं. देशाच्या सीमेवर जे कोणी शररात करत होते. ते सर्व बिळात बसले आहेत. त्याचं कारण म्हणजे मोदी आणि अमित शाह आहेत. देशात हिंसा फैलावणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील आणि अतिरेक्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. राणालाही भारतात आणलं. त्याला मुंबई आणलं जाईल. त्याला फाशी देण्यात येईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.