‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’

0
302

मुंबई, दि. ८(पीसीबी): महाराष्ट्रातील राजकीय गदारोळ अजूनही सुरूच आहे. एकीकडे खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून नेत्यांची गळती सुरूच आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्षाच्या चिन्हाबाबत सजग राहण्याचा इशारा दिला आहे. ‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.नुकत्याच झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.

ते म्हणाले ” शिवसेनेतून 40 आमदार फुटल्यामुळे आपले सरकार पडले आहे. आपल्याच पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर बंडखोर गटाने दावा केला आहे. अशा परिस्थितीत धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील राहू नका, शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा. ”
“निवडणूक चिन्ह गोठवल्यास शिवसेनेला आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.