मीरा भाईंदर, दि. १४ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर काही जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुखांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता नगरसेवकांनी आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत बंडाळी सुरू झाल्यामुळे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मोठा धक्का मानला जात आहे. पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा मोठ्या महापालिकांतून तसेच काही जिल्ह्यांतूनही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सामिल होत आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज (ता. १४) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत. ते शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे.
ठाकरे सरकारने बंद केलेली आणीबाणीतील बंदीजनांची पेन्शन योजना पुन्हा सुरु
मीरा भाईंदर शहरात गेल्या १३ वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान १८ शिवसेना नगरसेवक, तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे, त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होत आहेत.
माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शीतल म्हात्रे यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आठ दिवसातच शीतल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत.शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. 2012 आणि 2017 ला सलग दोन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.