शिवसेनेला धक्का… नवी मुंबईचे ३७ पैकी ३२ नगरसेवक शिंदे गटाकडे झुकले

0
187

नवी मुंबई, दि. ७ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतरच्या भूकंपाचे हादरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही बसताना दिसत आहेत. आज सकाळी ठाण्यातील शिवसेनेचे ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेतीलही ३७ पैकी ३२ माजी नगरसेवक शिंदे गटात सामिल होणार आहेत. आज संध्याकाळी हे सर्वजण शिंदे यांची भेट घेणार आहेत.

यापूर्वी नवी मुंबईत ठाकरेंवरील नाराजी आणि शिंदे यांना पाठिंबा म्हणून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तसेच मागाठणे विभागातील शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.

शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील माजी नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती.

एकूणच या फुटीमुळे नवी मुंबई, ठाणे, पुणे भागातील शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येत आहे. या फुटीमुळे ठाकरेंवरील नाराजी केवळ आमदारांच्या पातळीवर नसून ती खालीपर्यंत झिरपली असल्याचे दिसून येत आहे. यानंतर नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.