शिवसेनेत बंडाची ठिणगी अशी पडली…शहाजीबापूंनी सांगितलेला किस्सा

0
254

मुंबई, दि. ६ (पीसीबी) : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण १० ते १२ दिवसांसाठी ढवळलं गेलं आणि अखेर २९ जूनला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सगळ्या राजकीय घडामोडी फक्त दहा दिवसांत घडल्या. पण शिवसेनेला एवढं मोठं खिंडार पडलंच कसं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवसेनेशी बंडाची ठिणगी कुठून पडली याचं कारण सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी सांगितलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन होता. राज्यसभेत झालेली मतफुटी विधानपरिषदेत होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. दरम्यान हॉटेलमध्येच शिवसेनेने आपला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यावेळी घडलेला किस्सा आमदार शहाजी पाटलांनी सांगितला आहे. यावेळी सर्व आमदार बसले होते. संजय राऊतांचं भाषण चालू होतं. उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते बाथरूमला गेले. संजय राऊतांचं भाषण चालू होतं.

त्यावेळी संजय राऊत एक वाक्य म्हणाले, “म्हणजे शिवाजी महाराज बाजीप्रभूला सोडून गेल्यासारखं तुम्ही आम्हाला सोडून चालले काय? असं वाक्य राऊत म्हणाले. याचा अर्थ काय होतो की, शिवाजी महाराज बाजीप्रभूला सोडून गेले. म्हणजे याठिकाणी त्यांनी नकळत पणे शिवाजी महाराजांचा अपमान केला असा आरोप शहाजी पाटील यांनी केला. त्यानंतर उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी भाषणाला सुरूवात केली.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरूवातंच रागाने केली. ते म्हणाले, “मला माहितीये कोण आहे ते? आईच्या स्तनाचं दुध बाजारात कोण विकतंय ते मला माहितीये, जे कोण गद्दार असतील त्यांच्यासाठी शिवसेना नाही असं उद्धव ठाकरे वर्धापनदिनाच्या दिवशी म्हणाले होते. तर आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाजूला बसवाला पाहिजे होतं पण त्यांना कोपऱ्यात बसवलं. या सगळ्या गोष्टी आमच्या मनाला खूप लागल्या आणि आम्ही कार्यक्रम संपवून बाहेर आल्यावर निर्णय घेतला. बाहेर आल्यावर एकनाथ शिंदे यांना आम्ही म्हणालो की, काहीतरी करा नाहीतर आम्हाला पक्ष सोडण्यासाठी सुरूवात करून द्या आम्हाला खूप वाटा आहेत.” असा किस्सा आमदार शहाजी पाटील यांनी सांगितला. याच घटनेपासून बंडाची ठिणगी पडली असं त्यांनी ABP माझा या वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.
या घटनेनंतर सर्व आमदार शिंदे साहेबांना सांगू लागले की, आता खूप झालं, काहीतरी निर्णय घ्या. तेव्हापासून हे सर्व घडायला सुरूवात झाली असं शहाजी पाटील यांनी सांगितलं.