शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपने पाडली – उध्दव ठाकरे

0
271

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर आते. शिवसेनेचे १२ खासदार भाजपच्या बाजुने जाण्याची शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी आपला ठाकरी बाणा दाखवत बंडखोरांसह भाजपला कडक शब्दात ठणकावलं आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी उद्धव म्हणाले की, शिवसेनेत फूट बंडखोरांनी नाही तर भाजपने पाडली. भाजपच सेनेला संपवत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र एक लक्षात ठेवा, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळालात तरी धनुष्य माझ्याकडे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह बंडखोरांना इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दोन कोंबड्यांची झुंज लावण्याचं काम भाजप करत आहे. मात्र तुम्ही काहीही केलं तर लोक माझ्यासोबत आहे. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, संघर्ष करू आणि शिवसेना पुन्हा उभी करू, असं उध्दव यांनी म्हटलं.

दुसरीकडे शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ खासदारांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.