शिवसेनेत असते तर आधीच भुजबळ मुख्यमंत्री झाले असते…

0
232

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्यावेळी आम्हाला मोठा धक्का बसला होता, त्यातून सावरायला खूप वेळ लागला, पण भुजबळ जर शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते असं उद्धव ठाकरे म्हणाले. भुजबळांचे कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, नाहीतर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमलाच नसता असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ यांच्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. पण मी सांगतो की छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते. भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी मॉं असत्या तर अजून चांगलं झालं असतं.”

भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळी ते एकटे गेले, आता परत येताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सोबत आणलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “छगन भुजबळ यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीबद्दल अजित पवार यांनी आताच सांगितलं. हे मला आधीच सांगितलं असतं तर शिवसेना फुटताना मी त्यांना जबाबदारी दिली असती आणि सरकारही वाचलं असतं.”

ठोशास ठोसा कसा द्यायचा ते भुजबळ जाणतात
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ते होऊ शकलं नाही. महाराष्ट्र सदन बांधण्यात महाराष्ट्र सरकारने एक रुपया देखील खर्च केला नाही. तरी देखील छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, त्यांची बदनामी करण्यात आली. छगन भुजबळ ठोशास ठोसा द्यायचं चांगल जाणतात. ज्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असते तर ते सगळ्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.”