शिवसेनेच्या ६० उमेदवारांची यादी तयार, नवरात्रीत घोषणा

0
126

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून वेळापत्रकाची घोषणा कधीही होऊ शकते. महाविकास आघाडीचे जागावाटपही अंतिम टप्प्यात आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६० उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. आता कोण कुठून लढणार? हा प्रश्न आहे. तर नवरात्रीच्या दरम्यान पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले.

ठाकरे गटाच्या यादीत नाव असलेल्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना देण्यात आली आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले. नवरात्रीच्या दरम्यान पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर छत्रपती संभाजीनगर येथील भाजप पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचा दावाही दानवेंनी केला.

ठाकरेसेनेची २८८ जणांची यादी तयार आहे. कित्येक ठिकाणी एक-दोन-तीन जणांची नावं आहेत. आमच्या पक्षाची यादी तयारच असते. सगळे सर्व्हे, सगळी माहिती, संपर्क प्रमुख, विधानसभा प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा सर्वांसोबत उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक बैठका घेतल्या आहेत. तिथला अंदाज घेतला आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

विधानसभा ६० जागा आम्ही मागच्या वेळी जिंकल्या आहेत. कुठलाही पक्ष इतक्यात अधिकृतरित्या काही सांगत नाही, उमेदवाराने ते समजून घ्यायचं असतं, की आपल्याला निवडणूक लढायची आहे. शिवसेनेत अनेकांनी समजून घेत कामाला लागले आहेत, असंही दानवे म्हणाले.
अमित शहा महाराष्ट्रात, मशालीचा भाजपला धक्का; बाजारबुणगा म्हणत उद्धव ठाकरे कडाडले