शिवसेनेच्या ‘या’ दोन मोठ्या नेत्यांना एकनाथ शिंदेंचा झटका; पाच तास थांबूनही भेट नाकारली

0
73

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या प्रश्नाच अजून तरी ठोस उत्तर नाहीय. महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होतय. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोलल जातय. त्यासाठी इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु आहेत. भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत. यात शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत. मंत्रिपदासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. शुक्रवारी रात्री उशीरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर यांच्या नावाचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागच सरकार स्थापन झालं, तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. निदान यावेळी तरी मंत्रिपद मिळावे असा दोघांचा प्रयत्न आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांना भेट नाकारल्याच वृत्त आहे. हे दोन्ही आमदार मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्याजवळ जोरदार लॉबिंग करत आहेत.

काहींना एकनाथ शिंदे यांची भेट मिळाली, तर काहींना नाकारण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते. अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत.

दिपक केसरकर, तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना निराश होऊन परतावे लागले. या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहीती आहे. याआधी दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी असल्याचे कारण सांगून भेट नाकारण्यात आली होती.