शिवसेनेच्या मागणीला यश, पीएमआरडीएचा कारभार मराठीत

0
111

पिंपरी, दि. ८ऑगस्ट (पीसीबी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करावा, यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जानेवारी 2021 मध्ये पीएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने वेळाेवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळेच पीएमआरडीएने कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या सूचना आयुक्त याेगेश म्हसे दिल्या आहेत. हे शिवसेनेच्या मागणीचे माेठे यश असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य सुरेश वाडकर यांनी सांगितले. 

राज्यात 2020 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीबाबत आत्मियता व अस्मिता जाेपासण्यासाठी मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला हाेता. याबाबतचे परिपत्रक 6 नाेव्हेंबर 2020 राेजी काढण्यात आले हाेता. त्यानंतरही पीएमआरडीने इंग्रजी आणि हिंदी भाषेतच आपला कारभार सुरू ठेवला हाेता. मात्र, मराठी भाषेचा कामकाजात वापर करण्याबाबतच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाची अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी माजी खासदार कै. गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पीएमआरडीकडे सातत्याने पाठपुरावा केला हाेता. गेल्या तीन वर्षांपासून शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळेच पीएमआरडीएने कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या सूचना आयुक्त याेगेश म्हसे दिल्या आहेत. सामान्य नागरिकांशी केला जाणारा पत्रव्यवहार, सर्व नमुने, पत्रके, परवाने, टिप्पणी, आदेश, परिपत्रके, अहवाल आदी कार्यवृत्तांत मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे.   

प्राधिकरण कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर एखादी व्यक्ती किंवा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतूनच लिहिणार आहे. पदनामाचा उल्लेख, टिप्पणी, आदेश, परिपत्रके व इतर पत्रव्यवहार यावर सह्याही  मराठीतच करण्यात येणार आहेत. तसेच निमंत्रण पत्रके मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रण पत्रिका असावी. प्राधिकरणाच्या जाहिराती व निविदा किमान दोन मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध कराव्यात. मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिराती व निविदा मराठी भाषेत प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी मराठीचा यथायोग्य वापर करावा. मराठी वापराबाबतच्या सूचनांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुक्त म्हसे यांनी केल्या आहेत. पीएमआरडीएने कामकाजात मराठीचा वापर करावा, यासाठी शिवसैनिकांनी वेळावेळी प्रयत्न केल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश वाडकर यांनी सांगितले.