शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

0
3

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या नगरसेवकांची आज (शनिवारी) बैठक पार पडली. यात सर्व नगरसेवकांनी विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडण्यासाठी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची पक्षाने नियुक्ती केली होती. त्यानुसार खांडभोर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक निलेश बारणे, निलेश तरस, विश्वजित बारणे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात युवा संघटन बळकट केल्यानंतर विश्वजीत बारणे यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी हाती घेतली. पश्चिम महाराष्ट्रात संघटना बांधणी मजबूत केली आहे. संघटनेतील कामकाजाच्या अनुभवानंतर विश्वजीत यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. प्रभाग २४ मधून त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या माजी उपमहापौर झामाबाई बारणे यांचे पुत्र माजी नगरसेवक राहिलेल्या भाजपच्या सिद्धेश्वर बारणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. विश्वजीत यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या पहिल्या इंनिगला सुरुवात केली आहे. त्यांच्या रूपाने अभ्यासू, तरुण, शहरातील युवा पिढीच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व महापालिका सभागृहात आले आहे. विश्वजीत बारणे यांच्यावर विश्वास टाकून सर्व नगरसेवकांनी गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.

याबाबत विश्वजीत बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या सर्वांचा विश्वास पात्र ठरवेल. सभागृहात शिवसेनेचा आवाज दिसेल. शहराच्या विकासाच्या निर्णयाला शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा राहील. मात्र, चुकीच्या कामाला तेवढ्याच आक्रमकपणे विरोध केला जाईल.