शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात – संजय राऊत

0
274

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मी भाजपा हाच शब्द वापरत आहे. त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपाशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवलं जाऊ शकत नाही असंही संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहे. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“ईडीच्या किंवा अन्य काही अमिषाला बळी पडून आमदार पळाले असतील. जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही. आपण काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील हा पक्ष अद्याप मजबूत आहे. चार आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असा होत नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
सोडून का गेलेत याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्यांच्याशी चर्चा सुरु आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं. काहीजण संपर्कात असून कशा पद्धतीने जबरदस्तीने नेलं हे सांगत आहेत. दोन आमदार पत्रकार परिषद घेणार असून सगळी गोष्ट सांगतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नाहीत. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची असल्याने आमदार वर्षावर जातील. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळी पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे”.

“आजही आमचा पक्ष मजबूत आहे. उद्धव ठाकरे वर्षावरुन मातोश्रीला जात असताना रस्त्यावर जे चित्र होतं ती शिवसेना आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

“२० आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसत आहे, पण त्याने पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार,” असं संजय राऊत म्हणाले.