शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अविनाश रहाणे यांचे निधन

0
527

भोसरी,दि.०८(पीसीबी) – शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक व मंचर येथील शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक ॲड.अविनाश तुकाराम रहाणे (वय ५७ वर्षे ) यांचे आज सकाळी भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नात असा परिवार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात व विशेषतः आंबेगाव तालुक्यात शिवसेना रुजविण्यात व वाढविण्यात आविनाश रहाणे यांचा मोलाचा वाटा होता. या भागात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम सुरवातीपासूनच अविनाश रहाणे यांनी हिरारीने केले होते. आंबेगाव तालुक्यात अविनाश रहाणे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने चांगली कामगरी केलेली होती.

या सर्व कामांचे बक्षिस म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सन १९९९ व सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अविनाश रहाणे यांना शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या कडून पराभूत व्हावे लागले होते. त्यात १९९९ मध्ये तर त्यांचा निसटता पराभव झाला होता. मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या चारही निवडणुकांमध्ये अविनाश रहाणे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सन २००४ सली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले होते. मात्र तेथे मन रमल्याने व वैचारिक जुळवन न झाल्याने त्यांनी लवकरच राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेने चा समविचारी असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश केला. मनसे चे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागात मनसे चा विस्तार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र नंतरच्या काळात मनसेलाही जय महाराष्ट्र करत अविनाश रहाणे स्वगृही शिवसेनेत परतले व त्यांनी पुन्हा नव्या जोमाने शिवसेनेसाठी काम करण्यास सुरवात केली होते.

नंतरच्या काळात प्रकृती स्वस्थामुळे ते राजकारणापासून काही काळ दूर राहिले. मात्र ज्यावेळी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला त्यावेळी अविनाश राहणे पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला खंबीर साथ देत या भागात निष्ठावान शिवसैनिकांचे जोमाने नेतृत्व केले होते. राजकारण करताना त्यांनी साप्ताहिक बोभाटाच्या माध्यमातून काही काळ माध्यमक्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटविताना या भागात काही युवा पत्रकार घडविण्याचे काम केले. मधुमेह व उच्च रक्तदाब या बाबींमुळे गेले काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. सुरवातीला मंचर येथे तर नंतर भोसरी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांना देवज्ञा झाली. अविनाश रहाणे यांच्या जाण्याने मंचर परिसरावर व एकूणच सर्व शिवसेना (दोन्ही गट) परिवारावर शोककळा पसरली आहे.