शिवसेनेचे नाशिक विधानसभा प्रमुख निलेश कोकणे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला..

0
181

नाशिक, दि. १९ (पीसीबी) – शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यावर काल रात्रीच्या सुमारास एमजी रोडवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एकीकडे राज्यात शिवसेना व शिंदे सेना यांच्या घमासान सुरु असताना नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शहरातील एम जी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ हि घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे दुचाकीवर असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या धारदार शस्राने हल्ला केला. यात कोकणे हे गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिक शहराच्या मध्य विधानसभा प्रमुख असलेल्या निलेश उर्फ बाळा कोकणे हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने प्रवास करत होते. याच वेळी एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोकणे याना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ला का झाला हे अद्याप समजू शकले नाही.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर पलायन केले आहे. त्यामुळे हल्ला कुणी व का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी बाळा कोकणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी सेनेतील पडलेले दोन गट, अंतर्गत वाद यांचा काही संबंध या हल्ल्यामागे आहे का? याची पडताळणी पोलीस यंत्रणा करत आहे.
एकीकडे राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा वाद सुरू असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना भेटी देत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. तयावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः या पदाधिकाऱ्याची भेट घेत अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारात्यांनी दिला होता. मात्र आता नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.