शिवसेनेचे दहा खासदारही बंडाच्या तयारीत ?

0
408

नांदेड दि. २६ (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांच्या बंडाने घायाळ झालेल्या शिवसेनेला १८ पैक १० खासदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. नांदेडमध्ये इलेक्ट्राॅनिक मिडियाच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी हा दावा केला. (Bjp) शिवाय शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, ते युतीचे आमदार आहेत, असा इशाराही चिखलीकरांनी दिला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी भाजपचा संबंध नाही असे एकीकडे सांगितले जाते, तर दुसरीकडे त्यांचेच खासदार शिवसेनेचे १८ पैकी दहा खासदार फुटणार असल्याचा दावा करत आहेत. चिखलीकरांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवेसना व अपक्ष मिळून ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केली आणि ते सुरत मार्गे गुवाहाटीत मुक्काम ठोकून आहेत.

या बंडाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना हादरली असून महाविकास आघाडीचे सरकार देखील संकटात आले आहे. बंडखोराविरुद्ध राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने आंदोलने सुरू झाली आहेत. असे असतांना नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आणखी एक दावा केला आहे.

शिंदे यांच्या बंडाप्रमाणेच शिवसेनेचे खासदार देखील बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. १८ पैकी तब्बल १० खासदार बंडाचे निशाण फडकावण्याच्या तयारीत असल्याचा दावा देखील चिखलीकर यांनी केला. ते म्हणाले, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात असलेली नाराजी ही शिंदेंच्या बडाच्या रुपाने बाहेर पडली आहे. शिंदे यांना केवळ शिवसेनाच नाही, तर अपक्षांचा पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.

काही खासदारांनी देखील आपल्या तिखट प्रतिक्रिया या बंडानंतर दिल्या आहेत. राज्यातील आमदारांप्रमाणेच शिवसेनेच्या खासदारांमध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे १० खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच खासदार देखील बंड पुकारून बाहेर पडतील. आमच्या जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदेसोबत आहेत.

त्यानंतर आता जिल्ह्यात त्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा स्वतःला एकनिष्ठ म्हणवणारे जिल्हाप्रमुख देत आहेत. पण कल्याणकर हे युतीचे आमदार आहेत, त्यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यर्त्यांनी देखील जीवाचे रान केले होते. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना व त्यांच्या कुटुंबाच्या केसाला देखील आम्ही धक्का लागू देणार नाही, असा इशारा देखील चिखलीकरांनी दिला आहे.