शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे सुध्दा भाजपाच्या प्रेमात

0
368

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेची अवस्था अत्यंत केविलवाणी होत चालली आहे. राज्यातील शिवसेना आमदारांत दोन गट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. राज्यात शिंदे गट व भाजपने सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना या राजकीय धक्क्यातून सावरण्या आधीच शिवसेनेचे खासदारही भाजपच्या बाजूने बोलू लागले आहेत. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भाजपबरोबर जाण्याचे संकेत आज दिले. ते उद्या ( सोमवारी ) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या बाबत चर्चा करणार आहेत. नवी दिल्ली येथे खासदार कपाल तुमाने यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या १० खासदारांची स्वतंत्र बैठक झाल्यापासून खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे भाजपा सेनेच्या युतीत निवडून आलेले आहेत. सुरूवातीपासूनच लोखंडेंनी भाजपासोबत युती करायला हवी अशी भुमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आम्ही पंधरा खासदारांनी भाजपासोबत जाण्याची सातत्याने भुमिका मांडली आहे. उद्या ( सोमवारी ) उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आम्ही आपले म्हणणे मांडणार असल्याचे सदाशिव लोखंडे यांनी सांगताना भाजप सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.

सदाशिव लोखंडे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून तीन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. तरूणपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चेंबूर शाखेत सक्रिय होते. भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे ते समर्थक होते. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील आरक्षण निघाल्यावर तेथून मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही.

2014मध्ये लोकसभा निवडणूक सुरू असताना मतदानाच्या 15 दिवस आधी शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसेनेला उमेदवारच उरला नव्हता. शिर्डी मतदार संघात अनुसूचीत जातीचे आरक्षण आहे. त्यामुळे भाजपने त्यांचे माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे हे शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले. मागील आठवड्यात ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिंदे गटा विरोधात आंदोलन करताना शिर्डीत दिसले होते. राज्यातील शिवसेना आमदारांत दोन गट पडल्यावर आता लोखंडे यांना आता शिवसेनेने भाजप बरोबर जावे असे वाटत आहे.