शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटात

0
252

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती ‘साम’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. बहुसंख्य खासदारांनी शिंदे यांच्या बाजुने कौल दिल्याने शिववसेना नेत्यांची गोची झाली होती.शिवसेनेच्या खासदरांपैकी ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत हे वगळता बाकीचे १४ खासदार शिंदे गटाच्या ट्रायडंट हॉटेल येथील बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई : नुकतीच महाराष्ट्रातील सत्ता गमावलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी आणखी एक मोठा धक्का बसला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र 12 खासदार या बैठकीला उपस्थित राहीले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही 7 खासदार बैठकीला पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण 19 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बंडखोरी सुरू असल्याने लवकरच शिवसेनेचे काही खासदारही पक्षांतर करू शकतात, असे मानले जात आहे.

याआधीही काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना एकनाथ गटाशी समेट करण्याची शिफारस केली होती. उद्धव यांनी बोलावलेल्या बैठकीला गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्य माने, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित, राजन विचारे आणि राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदार पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीला शिवसेनेचे तीन राज्यसभा खासदारही उपस्थित होते. एकूण 22 जणांना आमंत्रित करण्यात आले होते.

उद्धव ठाकरेंच्या सभेला न गेलेल्या खासदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांचा समावेश आहे. याआधी श्रीकांत शिंदे, भावना गवळी, कृपाल तुमाने यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने नुकतेच गवळी यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी राजन विचारे यांना जबाबदारी दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही बैठक राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आली होती. बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या बहुतेक सदस्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे सुचवले. अशी माहिती शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी दिली.