मुंबई ,दि.२५(पीसीबी) – सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत सरकारला इशारा दिला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असते कुटुंंबाची नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते भडकलेले आहेत, ते काय करतील याची माहिती नाही. सांगली, सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक आदेशाची वाट पाहत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांच्याविषयी आम्हाला आदर –
फडणवीस यांनी या झमेल्यात पडू नये, आमचे आम्ही बघून घेऊ अन्यथा फडणवीस यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, असेही राऊत म्हणाले. फडणवीस यांनी त्यांची राहिलेली प्रतिष्ठा वाचवावी, असेही राऊत म्हणाले.
मोदी यांची प्रतिष्ठा देशाची प्रतिष्ठा –
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची प्रतिष्ठा ही देशाची प्रतिष्ठ आहे. गुजराथ दंगली प्रकरणात त्यांना मिळालेली क्लिन चिट चे आम्ही स्वागत करतो, असेही राऊत म्हणाले.