औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) : शिवसेना आणि युवासेनेतून हकालपट्टी झालेल्या शिंदे समर्थकांचे तातडीने पुनर्वसन केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. आता काही दिवसांपुर्वी युवासेनेच्या उपसचिव पदावरून हटवण्यात आलेले राजेंद्र जंजाळ यांना शिंदे यांनी औरंगाबादचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे.
मुंबईत शिंदे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राजेंद्र जंजाळ हे युवासेनेचे उपसचिव, महापालिकेतील माजी उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, सभागृह नेता म्हणून कार्यरत होते. युवासेनेत असतांना ते आदित्य ठाकरे यांच्या मोजक्या विश्वासूंपैकी एक म्हणून ओळखले जायचे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडात संजय शिरसाट सहभागी झाल्यानंतर जंजाळ देखील त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची युवासेनेच्या उपसचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.जंजाळ यांनी तेव्हा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप करत मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी आपली हकालपट्टी करायला लावल्याचा आरोप केला होता. राजेंद्र जंजाळ हे शिवाजीनगर भागाचे नगरसेवक होते. संजय शिरसाट यांचे समर्थक म्हणून जंजाळ ओळखले जातात. त्यामुळे शिरसाट यांच्या बंडानंतर जेव्हा ते मतदारसंघात आले तेव्हा विमानतळापासून ते त्यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या वाहन रॅलीसाठी जंजाळ यांनीच पुढाकार घेतला होता.
एवढेच नाही तर औंरगाबादेतून मुंबईत शक्तीप्रदर्शनासाठी शिरसाट समर्थकांना घेऊन जाण्याची महत्वाची जबाबदारी देखील जंजाळ यांनी पार पाडली होती. आता शिरसाट यांच्या शिफारशीवरूनच जंजाळ यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही सुटलेला नसला तरी, शिंदे यांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून जंजाळ यांची नियुक्ती केल्याने संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.