पिंपरी, दि. १५ : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेची गुरुवारी (15) आढावा बैठक होणार आहे. उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत हे पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत.
कासारवाडीतील कलासागर हॉटेल येथे दुपारी अडीच वाजता ही बैठक होणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही मतदारसंघाच्या आढावा बैठका पार पडणार आहेत.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही सदस्य नोंदणी वेगात सुरू आहे. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारत आहेत. विविध पक्षातील पदाधिकारी पक्षात प्रवेश करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेची तयारी सुरू आहे.










































