शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे कारण शिवतीर्थ म्हणजे शिवसेना

0
268

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधकांची इच्छा आहे की, एकत्रितपणे लढावं पण अजून तसा निर्णय झाला नाही असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे कारण शिवतीर्थ म्हणजे शिवसेना असं समीकरण आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

शरद पवारांनी संजय राऊतांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, “भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. कारण राऊतांना अटकही त्यांनीच केली अन् आरोपही तेच करतात. त्याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊतांना त्यांनाच अटक केली त्यामुळे कुणी वाऱ्यावर सोडलं हे वेगळं सांगायची गरज नाही” असं पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर कोण आरोप करतंय त्याची नोंद आपण घेतली पाहिजे असंही ते म्हणाले.

सध्या शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळावा घेण्यासाठी वाद सुरू आहेत पण शिवतीर्थ आणि शिवसेना हे समीकरण आहे असं वक्तव्य पवारांनी केलं आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.