शिवसेनेचा चिरेबंदी वाडा भाजपाने फोडला, पुढे काय ? थर्ड आय – अविनाश चिलेकर –

0
307

महाराष्ट्राच्या राजकारणात गेले महिनाभरात खूप मोठी उलाढाल झाली. भाजपाने जे राजकीय वादळ निर्माण केले त्यात शिवसेनेचे गलबत बुडते की काय अशी अवस्था झालीय. ४० आमदार, १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. आज जिल्हा प्रमुख शिंदेंकडे गेला, उद्या माजी आमदार- माजी खासदार गेला, नगरालिका किंवा महापालिकेचे नगरसेवक फुटले अशा बातम्या रोज सुरू आहेत. दुसरीकडे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उठाव म्हणा किंवा गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टीचा रतीब सुरूच आहे. आता शिवसेनेते नेते, उपनेते, कार्यकर्ते राहतात की नाही अशी शंका यावी इतकी गळती लागलीय. अक्षरशः शिवसेनेचे आकाश फाटलंय, आता थिगळ कुठे कुठे लावायचा हा प्रश्न आहे. भाजपाने शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी मतांचे दुसरे वाटेकरी नकोच, असा चंग बांधला आणि सेनेच्या चिरेबंदी वाड्याला सुरूंग लावला. निवडणूक आयोगाने उद्या शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले आणि शिंदे गटाने शिवसेनाभवनावर ताबा मारला तर काय अवस्था होईल याची कल्पना करवत नाही. मराठी माणसाला शिवसेना पाहिजे आहे, पण जिद्दी अमित शाह यांना शिवसेनेचे विसर्जन करायचे आहे. शिवसेनेसाठी भाजपा हा जिवश्च कंठश्च मित्रच आता कर्दनकाळ ठरला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे ३५ आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करून जिंकलेत आणि त्यांच्यासाठी महाआघाडी हा गळ्यातला धोंडा होता. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री करायचा पवार काका पुतण्यांचा चंग होता व आहे.

त्यांनाही शिवसेनेच्या त्या ३५-४० जागा पाहिजे होत्या. जसे भाजपाला हिंदुत्ववादी मतांमध्ये भागीदारी नको तसेच राष्ट्रवादीलासुध्दा प्रादेशिक मतांमध्ये शिवसेनेची भागीदारी नको होती. अशा प्रकारे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटे आली आणि आज तरी शिवसेना गलितगात्र झाली. आता सर्वोच्य न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाला जीवदान पाहिजे तर त्यांना कुठेतरी विलीन होण्याशिवाय दुसरा रस्ता नाही. मनसे मध्ये विलीन म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होणार. बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये जायचे म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाकायची. अशा परिस्थितीत राजकिय अस्तित्व कायम ठेवायचे तर शिवसेना आणि ठाकरे हे तयार होतील का याबाबत मोठे प्रश्न चिन्ह आहे. अखेर भाजपा हाच पर्याय राहतो. भाजपाला आगामी काळात म्हणजे २०२४ मध्ये १०५ आमदारांचे संख्याबळ थेट १५०-२०० करायचे आहे. ४८ खासदार भाजपाचेच जिंकून आणायचे लक्ष्य आहे. त्यामुळे बंडखोरीचे स्क्रिप्ट ज्यांनी लिहीले आहे त्यांना हवे तसेच सगळे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आगामी राजकारणात महाराष्ट्रातून संसदेत ४५ खासदार, विधीमंडळात २०० आमदार आणि २७ पैकी किमान २० महापालिका, ३० वर जिल्हा परिषदा भाजपाला आपल्या विचारांच्या करायच्या आहेत. सगळे कसे अगदी पध्दतशीर चाललेय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण ज्यांनी केला असे घोटाळेबाज तमाम पुढारी भाजपाच्या गळाला लागलेत.

मंत्री राहिलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता मुंबई पोलिस आयुक्तांची जेलवारी नजरेसमोर आहे. आपली तशी अवस्था नको म्हणून राणे, कृपाशंकसिंह, प्रविण दरेकर यांच्यासारख्या रथीमहारथींनी टोपी फिरवली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या भावना गवळी, आनंद आडसूळ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव अशा अनेकांच्या ईडी कारवाई फाईल्स आता बंद होतील. गेल्या वर्षभरात अजित पवार यांच्यासारखा ढाण्या वाघसुध्दा भाजपा विरोधात डरकाळी फोडायचा बंद झालाय. जो कोणी विरोध करेल त्याच्या मुस्क्या कशा आवळायच्या ते भाजपाला माहित आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ला फक्त छू म्हटले की ते अंगावर येतात आणि होत्याचे नव्हते करतात. शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तसे भाजपापुढे कोणाचेच डोके चालेनासे झालंय. अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह भीष्म म्हणजे शरद पवार यांचीसुध्दा मती गूंग झाल्यासारखी अवस्था आहे. राजकारणात कालचा पोर असलेल्या एका देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्याने बलाढ्या साम्राज्य असलेल्या ठाकरे, पवार यांना एकदम चेकमेट केलंय. किमान आजचे हे चित्र आहे.

राजकीय पुढारी मावळत्या सुर्याला कधीच नमस्कार करत नाहीत, ते उद्याचे पाहतात. मोदी, शहा, फडणवीस यांच्या हातात सगळे पत्ते आहेत. आज त्यांची सरशी असल्याने तमाम पारशी भाजपाकडे तोंड फिरवून बसलेत. ज्यांना राजकारणाचे दुकान होय दुकान चालवायचे ते आज गुंतवणूक आणि परताव्याचा हिशेब मांडतात. फाटक्या खिशाचा कार्यकर्ता आता आमदार, खासदार काय साधा नगरसेवक, ग्रामसदस्य सुध्दा होऊ शकणार नाही. इतका बाजारूपणा राजकारणात आलाय. बंड कऱणाऱ्यांना ५० कोटी रुपये दिल्याच्या बातम्या आल्या. ज्यांनी बंड केले आणि आपल्या बरोबर आले त्यांना पुन्हा जिंकून आणायचा वज्रनिर्धार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. आज एका आमदाराच्या निवडणुकिचा छुपा खर्च किमान १० – १५ कोटी आहे. लोकशाही आम्हाला कुठे घेऊन चाललीय त्याचे असे शेकडो दाखले आहेत. राजकारणात्या बाजारपेठेत भाजपाला किमान तीन हजार कोटींची देणगी मिळते आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला १०० कोटी सुध्दा जमत नाहीत. सट्टाबाजारात ज्या कंपनीचा बाजार दामदुप्पट परतावा देणार तिकडे लोक पैसे लावतात. रेसकोर्सवर हारणाऱ्या घोड्यावर कोणी खेळत नाहीत, डार्क हॉर्स कोणता ते शोधून त्यावर खेळतात. थोडक्यात मोदींचे नाणे २०१४ पासून राजकारणात चालते तेच २०२४ मध्ये चालणार हे शिवसेनेच्या बंडखोर आमदार खासदारांनी ओळखले. आता होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकांनाही भाजपाची सरशी होणार याचा अंदाज सगळ्यांना आलाय. वारे कोणत्या दिशेने वाहते ते दिसतेय. अशा परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेसारख्या बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही. बंड यशस्वी झाले की नाही, कोर्ट काय निकाल देणार ते आता काळच ठरवेल. आता माघार नाही.