शिवसेनेचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही -नारायण राणे

0
184

मुंबई , दि. १६ (पीसीबी)- मुंबई मध्ये फक्त भाजपाचा खासदार निवडून येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपामध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.

“दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार. मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी केल्याची आठवण करुन देत टोला लगावला.

निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.नुसतं आमच्यावर बोलायचं, आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.