: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठं भाकीत केलं आहे. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय, तसेच आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. या प्रकरणाला सातत्याने तारीख पे तारीख मिळताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात कदाचित यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच संजय राऊतांनी मोठा दावा केलाय.










































