शिवसेना ११० जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत

0
111

१९ जुलै (पीसीबी) मुंबई, दि. १९ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गुरुवारी शिवसेनेची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास ४ तास ही बैठक चालली. या बैठकीत शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी होते. या बैठकीत शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकूण ११० जागांवर निवडणूक लढण्यासाठी तयारी करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पण या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केलेल्या एका सूचनेमुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये धडकी भरल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघात लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी घेण्याची तंबी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिली. विशेष म्हणजे जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे यांच्या या सूचनेमुळे आमदारांना धडकी भरली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे शिवसेनेची एक जागा कमी झाली. तसेच नाशिकच्या जागेवरूनही प्रचंड नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या.

राज्यात ११० विधानसभा निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रभारीसुद्धा नेमले आहेत. सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्य नोंदणीवर भर द्या, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेना युवासेना महिला आघाडीत पद नेमणूक करा. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघावर लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

आपसात भांडणे कटाक्षाने टाळा
महायुतीतच लढायचे आहे, आपसात एकमेकांवर टीका करणे टाळा. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा. महिला, युवा कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी सूरू करा. या नोंदणीच्या कामाला गती द्या, अशा सूचना शिंदेंनी केल्या. आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात प्रबळ दावेकर कोण? त्यावर काम करणार असून निवडून येणाऱ्यालाच तिकीट वाटपात आधी प्राधान्य देणार, असे एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची विधानसभेच्या ११० जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ११० निरीक्षकही नेमले आहेत. शिवसेनेला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे भाजपच्या दिल्लीश्वरांकडे मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.