रहाटणी, दि. ७ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेपासून निवडणूक आयोगाच्या सुनावणीपर्यंत अनेक मुद्द्यांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. निवडणूक चिन्हासंदर्भात 27 सप्टेंबरला सुणावणी होणार असून न्यायालयाच्या कामकाजाबाबत काही बोलायचे नाही असे आम्ही ठरविले आहे. पण, लोकशाही मजबूत करणारे निकाल असतील अशी मला खात्री आहे, असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.
रहाटणीतील एसएनबीपी या शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी केसरकर यांनी आज (बुधवारी) संवाद साधला. खासदार श्रीरंग बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, ”आम्ही मुळातच भाजप-शिवसेना एकत्र आहोत. अगदी मुंबई महापालिकेत आमचे 150 पेक्षा जास्त अस्तिवातले नगरसेवक आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई महापालिका जिंकू, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकू, सगळ्या नगरपालिका तर जिंकूच पण सगळ्या जिल्हा परिषदा सुद्धा जिंकू”.
शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा की शिंदे गटाचा होणार याबाबत विचारले असता मंत्री केसरकर म्हणाले, ”आमचे मुख्यमंत्री खूप काम करतात. लोकांच्या आनंदात सहभागी होतात. दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे घोषणा करतील. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ट आहेत. म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी जशा लढा दिला. तसेच त्यांच्या प्रथा-परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिब्ध आहेत. परंतु, दसरा मेळाव्याबाबत काय करायचे याच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ख-या अर्थाने बाळासाहेबांबद्दल त्यांना असलेला आदर आणि बाळासाहेबांची भूमिका, व्यापक हिंदुत्वाचे तत्व पुढे घेऊन शिंदेसाहेब चालत आहेत. त्यात कुठलेही राजकारण येऊ देणार नाही”.