मुंबई, दि. १ (पीसीबी) – ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांचा मृत्यू झाला आहे. सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडला आहे. त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे झाल्याचं आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोरे यांचा अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने घाटकोपर, विक्रोळी परिसरात खळबळ उडाली आहे. मोरे हे डॅशिंग नेते होते. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार असायचा. धडाडीचा नेता, कार्यकर्ता म्हणून विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात त्यांचा चांगला परिचय होता. त्यांचा मृतदेह संदिग्ध स्थितीत आढळल्याने अनेक कयास लढवले जात आहेत.
सुधीर मोरे यांचा मृतदेह काल गुरुवारी रात्री रेल्वे रुळावर पडलेला आढळला. सुधीर मोरे एका खासगी मिटिंगला जातो म्हणून घराबाहेर पडले होते. त्यांनी सोबत बॉडीगार्डही नेले नव्हते. मात्र, बराच उशीर झाला तरी मोरे परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता घाटकोपर रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झालेले होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मोरे यांच्या मृत्यूचे वृत्त वाऱ्यासारखं पसरल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं? मोरे या ठिकाणी का आले होते? कुणाला भेटले होते का? की एकटेच होते? आदी प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.
सुधीर मोरे माजी नगरसेवक होते. ते शिवसेनेचे विभाग प्रमुखही होते. शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी लोकांचे दोस्त नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते गोरगरीबांची सेवा करत होते.
सुधीर मोरे यांच्या राजकारणाची सुरुवात अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेतून झाली होती. त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते निवडूनही आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विक्रोळी पार्कसाईट हा त्यांचा बालेकिल्ला होता. त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी काशीनाथ धारली यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवून मोठ्या मताने विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा हा मतदारसंघ महिला राखीव झाल्यावर त्यांनी डॉ. भारती बावधाने यांनी तिकीट मिळवून देत त्यांना निवडून आणलं होतं.
त्यानंतर 2018-18मध्ये पुन्हा हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला. तेव्हा त्यांनी आपला छोटा भाऊ सुनील मोरे यांच्या पत्नी स्नेहल मोरे यांच्यासाठी तिकीट मागितलं. पण शिवसेनेने मोरे यांच्या भावजयीला तिकीट न देता पुन्हा भारती बावधाने यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी मोरे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. मोरे यांनी भावजय स्नेहल मोरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव घडवून आणला होता. स्नेहल मोरे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा सर्व काही विसरून सुधीर मोरे शिवसेनेत सामील झाले होते