भरजरी वस्त्रांची लक्तरे व्हावीत तशी आज शिवसेनेची अवस्था झाली. मुंबईतील मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ मध्ये स्थापन झालेली शिवेसना. सुरवातीला ठाणे, मुंबई, कोकण हेच साम्राज्य होते. पुढे ही संघटना महाराष्ट्रात फोफावली आणि देशभर चर्चेचा विषय ठरली. भाजपचे रोपटे या मातीत कधीच रुजत नव्हते. मराठी अस्मितेबरोबरच ठाकरेंनी हिंदुत्वाची हुंकार दिला आणि शिवसेनेच्या जोडनी भाजपचा वटवृक्ष इथे वठला. भाजप तसा वाण्या बामनांचा पक्ष होता, पण शिवसेनेने जीवश्च कंठश्च मैत्रीचा वायदा केला आणि भाजपला डोक्यावर घेतले. ग्रामिण भागात भाजपसाठी जमिनीची मशागत केली, खत पाणी दिले. हिंदुत्ववादी मतांमध्ये दुसरा भागीदार नको, असे अमितभाई शाह यांचे फर्मान आले आणि भाजपने शिवसेनेचा गळा घोटायला सुरवात केली.
भाजपचा कावा लक्षात येताच शिवसेनेने दुसरा राष्ट्रवादीचा घरोबा केला. श्वास कोंडला, घुसमट वाढली म्हणून जीव वाचविण्यासाठी शिवसेनेला हे करणे भाग पडले. सेना संपवायचीच हे शाह यांचे टार्गेट म्हणून त्यांनी सेनेच्या वर्मी घाव घातला. एकनाथ शिंदेंसह ४० आमदार, १३ खासदार साम, दाम, दंड, भेद नीती वापरून फोडले. आज साठीत पोचलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था विकलांग करून टाकली. एक नक्की आहे की, शिवसेनेचे खासदार, आमदार शिंदेंच्या बरोबर गेलेत, पण सामान्य लोकांचे जनमत आजही ठाकरेच्या बरोबर आहे. शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या खासदार-आमदारांना शिंदेंचा फोटो लावून मते मागायची हिंमत नाही कारण परभाव समोर दिसतो. गद्दारीचे बिरूद कपाळी मिरवणाऱ्यांना जनता किंमत देत नाही. दक्षिणेत आंध्र राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे उदाहरण उध्दव ठाकरेंसाठी लागू पडते.
दहा वर्षआंपूर्वी आंध्राचे तत्कालिन मुख्यमंत्री वाय.एस.आर. रेड्डी यांचे अपघाती निधन झाले. पाठोपाठ त्यांच्या पक्षाची मान्यता, चिन्ह गेले. थोडक्यात त्यांचे अस्तित्व संपल्यात जमा होते. काय चमत्कार झाला आणि त्यांचे चिरंजीव जगन मोहन रेड्डी रिंगणात उतरले. काँग्रेसच्या विरोधाला त्यांनी आणि जनतेनेही जुमानले नाही. तब्बल १५० वर जागा जिंकून त्यांनी सलग दहा वर्षे संपूर्ण आंध्र प्रदेश ताब्यात ठेवलाय. आज उध्दव ठाकरे यांची अवस्था जगनमोहन रेड्डी यांच्यासारखीच आहे, पण उद्याचा उषःकाल त्यांचा आहे. भाजपने शिवसेनेची शिडी केली आणि सत्तेचा सोपान गाठला. भाजपने कोणाशीही नको नको त्यांच्याशी संग केला, पण ते सगळे न्याय्य म्हटले जायचे. शिवसेनेने जीव वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचा सहारा घेतला तर शिवसेनेला बदफैली ठरवले गेले. आजही लोकांना ते बिलकूल आवडलेले नाही. राज्यात रोज एक शिवसेनेचा नेता शिंदेंना जाऊन मिळतोय, पण संजय राऊत अथवा खुद्द ठाकरे यांना त्याची ना खेद ना खंत. सेनेचे कसे होणार, असा सर्रास प्रश्न केला जातो.
जोवर निवडणुका होत नाहीत तोवर फक्त एक एक सर्वेक्षण रिपोर्ट येत आहेत. ते किती खरे किती खोटे ते माहित नाही. पुन्हा फडणवीस सत्तेवर येणार असे एका सर्वेक्षणाचा हवाला देत भाजप नेते सांगतात, पण चित्र धूसर आहे. शिवसेना मुंबईत पाहिजेच असे शिवसेना विरोधकांचे आणि तमाम मराठी बांधवांचे ठाम मत आहे. पुढच्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकित खरी आणि खोटी शिवसेना यातला फरक दिसेल, तोवर शुभेच्छा !!!