शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी

0
186

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या उलथापालथीनंतर राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या संपूर्ण घडामोडींवर उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत २६ आणि २७ जुलैला प्रकाशीत होणार असल्याचे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले. त्यामध्ये ”जोरदार मुलाखत..सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत..सामना..26 आणि 27 जुलै. मी: साहेब, फुटीर गटाची तुम्हाला एक विनंती आहे. उद्धवजी : बोला..मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो..खळबळ जनक मुलाखत, असे ट्वीटकरत राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप मुंबईला टॅग केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरही राज्यातील राजकारण शांत झाले नाही. बंडखोर आमदारांनी ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर `सामना`मधील ही पहिलीच मुलाखत असणार आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामनामध्ये या मुलाखतीबाबात माहितीही प्रकाशित करण्यात आली आहे.

‘गद्दारांनी केला पाठीवर वार, मग आता वाचाच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार!’ अशा मजकूरासह सामनामध्ये मुलाखतीबाबात माहिती देण्यात आली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय भूकंप झाला. शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड केले. त्यानंतर त्यांच्या गटात १२ खासदार आणि अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते सामील झाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही वेगळे झालो असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. ते नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.