शिवसेना नेते रामदास कदम ढसाढसा रडले…

0
202

– उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण त्याआधीच त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत कदम यांना पुन्हा नेतेपद दिलं. पण हकालपट्टीमुळे कदम चांगलेच निराश झाले आहेत. शिवसेनेसाठी आम्ही 52 वर्ष सर्वकाही केलं, असं सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले. कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावरही घणाघाती आरोप केले.

कदम यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असं 52 वर्षात कधीच वाटलं नाही. पण शरद पवारांनी डाव साधत पक्ष फोडला. तरीही उद्धव ठाकरेंना पवार आणि सोनिया गांधींनी सोडवत नाही. पक्ष फुटत असताना शरद पवार कशासाठी हवे आहेत, असा सवालही कदम यांनी केला.
मी राजीनामा दिला असला तरी खूप अस्वस्थ आहे. पक्षात 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा देतो, याचा विचार पक्षप्रमुखांनी करायला हवा. मी आनंदी नाही, वेदना होत आहेत. राष्ट्रवादीसोबत जाऊ नका, असं हात जोडून सांगितले होते. पण उद्धव ठाकरे बोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही, अशी टीकाही कदम यांनी केली.

आमदारांच्या नाराजीची नोंद उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर ही वेळच आली नसती. पक्षातून किती जणांची हकालपट्टी करणार, असा सवाल करत कदम यांनी तुमच्या आजुबाजूला कोण आहे हे आधी पहा, असं आवाहनही केलं. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला असताना त्यांच्याशी बोललो. पण त्यात यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजूला करावं, असं कदम म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी माझंच मंत्रालय घेतल्याचे सांगत कदम यांनी नाराजी व्यक्त केली. ते मला काका-काका म्हणायचे. पण त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं. मंत्रालयात येऊन ते बैठका घ्यायचे. पण ठाकरे असल्यानं आम्ही ते सहन केलं, अशी भावना कदम यांनी व्यक्त केली. पण एवढं असूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केलं.