मुंबई, दि. १३ (पीसीबी) : शिवसेनेतील बंडखोरीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावण्याची नामुष्की ओढावली. शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राज्यातील सत्ता गेलेली असतानाच पक्षाचं संघटनही खिळखिळं झालं आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे.
शिवसेना भवनापासून ते मातोश्रीपर्यंत दररोज विविध नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. अशातच विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा ठोकला असून सदस्यसंख्येनुसार हे पद आम्हाला मिळायला हवं, अशी मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास पक्ष ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवणार, याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून काही नावे या पदासाठी स्पर्धेत आहेत. प्रामुख्याने अंबादास दानवे यांचे नाव आघाडीवर आहे.