शिवसेना दसरा मेळावा वादात आता शरद पवारांची मध्यस्थी

0
216

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला सबुरीचा सल्ला

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने उभा ठाकला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून दोन्हीकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेत असते. तरीही शिवसेनेला अजून शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उडी घेतली आहे. पवार यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पवारांच्या या सल्ल्यामुळे ते शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मैदानात उतरले असल्याची जौरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना हा सल्ला दिला. मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा हा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतात की मैदानासाठीचा आग्रह कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. मोदी सरकारला टक्कर देण्यावर आणि देशात नवा पर्याय निर्माण करण्यावर या भेटीत अधिक भर दिला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पवार आणि नितीश कुमार यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गट आणि शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावरून वाद न घालण्याचं आाहन केलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून मेळावे घेत आले आहेत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर मेळावे घेत आहेत. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये, असं अजित पवार म्हणाले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका. शिवाजी पार्क मैदानावरील सभा झाल्यानंतरच जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.