शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार…! वाचा सविस्तर…

0
289

पुणे,दि.३०(पीसीबी) – पुण्यात वानवडी परिसरात शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर एका टोळक्याने गुरुवारी संध्याकाळी पिस्तूलमधून गोळीबार केला. याप्रकरणी तीन आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अतिक इक्बाल शेख (वय 37, रा. सय्यदनगर, हडपसर), सादीक शेख (वय 25) व हुसेन मुस्तफा कादरी या आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज अफजल हुसेन शेख (वय 37) यांनी पोलिसांकडे आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

तक्रारदार ईम्तियाज शेख आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. 27 डिसेंबर रोजी शेख यांचा भाऊ इम्रान शेख व आरोपी सादिक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांची भांडणे झालेली होती. त्याचा राग मनात धरुन 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी तीन आरोपी दुचाकीवर शेख यांचे सय्यदनगर महंमदवाडी येथील शिवसेना अल्पसंख्याकच्या जनसंर्पक कार्यालयात आले. आरोपी अतिक शेख याने स्वत: हातात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. तक्रारदार कार्यालयात नसताना आरोपीने कार्यालयातील वस्तूंवर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन ‘यहा के भाई लोग हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे’ असे बोलुन फायरिंग केली. गोळीबाराची घटना कळताच तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस शिवले करत आहे.

दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.