शिवसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक

0
241

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – शिवसेना खासदारांची अत्यंत महत्वाची बैठक आज दुपारी १२ वाजता मातोश्री मध्ये आयोजित कऱण्यात आली आहे. आमदारां पाठोपाठ खासदारांचासुध्दा शिंदे गटाबरोबर जाण्याचा मनसुबा असल्याच्या बातम्या सुरू असल्याने आजच्या बैठकिला महत्व प्राप्त झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १० खासदारांची बैठक पार पडली. त्यावेळी बहुतांश खासदारांनी भाजपा बरोबर जायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही जाहीरपणे सांगितले की, आम्ही युतीमध्ये निवडूण आलो आहोत. राष्ट्रवादी बरोबर जायला सर्वांचाच विरोध आहे, म्हणून भाजपा बरोबर गेले पाहिजे.

विदर्भातील तीन खासदारांनी तोच सूर आळवला. भावना गवळी यांनी एक पत्र लिहून उध्दव ठाकरे यांच्याकडे आपली भावना व्यक्त केली. गवळी यांच्यावर ईडी ची मोठी कारवाई सुरू असल्याने त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कारवाई टाळण्यासाठी भाजपामध्ये जाण्याचा त्यांचा आग्रह कायम आहे. विशेष म्हणजे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी सुध्दा भाजपा बरोबर चला असे सांगत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर खासदरांच्या बैठकिला महत्व आहे.