मुंबई, दि. ५ (पीसीबी) : विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईत होत असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील हवा चांगलीच तापली आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांचे प्रमुख आकर्षण असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटात ही राजकीय लढाई सुरु असतानाच पडद्यामागे निवडणूक आयोगाच्या हालचालींनाही वेग आल्याची माहिती आहे. मुंबईत दसरा मेळाव्याची धामधुम सुरु असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीमध्ये बाजू मांडण्याचे काम करणार आहेत. यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये निवडणूक आयोग शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, याबाबतचा निकाल देऊ शकते. निवडणूक आयोगाकडून शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देऊ केली आहे. त्यामुळे या मुदतीपर्यंत किंवा त्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे आता येत्या ४८ तासांत काय घडणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना, घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे ३६० अंशांमध्ये बदलू शकतात.
शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी सर्व कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्याकडून आयोगापुढे बाजू मांडण्यात येणार आहे. कोणते मुद्दे मांडायचे, नेमकी भूमिका काय असावी यासाठी हे पदाधिकारी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. तर शिंदे गटाचे नेतेही सध्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कोणते महत्त्वाचे पुरावे सादर केले जाणार, हे पाहावे लागेल.