शिवसेना उबाठाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

0
38

नवी दिल्ली, दि. 12 (पीसीबी) : महाविकास आघाडीचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी काल गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यानंतर आज शिवसेना उबाठाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात ही भेट सुरु आहे.

शिवसेना उबाठाच्या खासदारांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट मागितली होती. पण त्यासाठी त्यांना वेळ देण्यात आली नाही. अखेर आज त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली. ठाकरेसेनेचे ७ खासदार मोदींच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीचं नेमकं प्रयोजन अद्याप समजू शकलेलं नाही. पण राज्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला सुरु असलेल्या घडामोडी पाहता मोदी आणि ठाकरेसेनेच्या खासदारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान विविध पक्षांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटत असतात. अधिवेशन सुरु असताना गाठीभेटींचा सिलसिला सुरु असतो. त्यामुळे मोदी आणि ठाकरेंच्या खासदारांची भेट ही अशाच सदिच्छा भेटींचा भाग आहे का की यामागे आणखी काही कारणं आहेत, याची चर्चा जोर धरु लागली आहे.